गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

रामशेज, देहेरगड

रामशेज



गावांबाहेरून दिसणारा रामशेजचा किल्ला 

नाशिक जिल्हा हा तसा गड, किल्ल्यांचा जिल्हा ओळखला जातो. ह्या नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त गड किल्ले आहेत आणि प्रत्येक किल्ल्याच एक वेगळ वैशिष्ट आहे. त्यातलाच एक 'रामशेज' हा किल्ला स्वराज्यातील सर्वात लहान किल्ला म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच ह्या किल्ल्याची कीर्ती सुद्धा महान आहे. 

संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत जेव्हा औरंगजेबाने स्वराज्यावर आक्रमण केले तेव्हा बरीच वर्षे त्याच्या हाताला काही लागले नाही. मग त्याच्या असे लक्षात आले की छत्रपती संभाजी महाराजना पराभूत करण हे सोप काम नाही. कारण एकूणच छत्रपती संभाजी महाराजांची ताकद आणि स्वराज्याची खरी ताकद ही ह्या गड किल्ल्यांमध्येच होती. आणि म्हणून त्याने स्वरजयचे गड किल्ले काबिज करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यातूनच स्वराज्यातील सर्वात लहान किल्ला म्हणून त्याने रामशेज ह्या किल्याची निवड केली.

श्रीराम वनवासात असतांना त्यांनी या डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता, त्यामुळे या डोंगराला आणि किल्ल्याला "रामशेज" हे नाव मिळाले. रामशेज म्हणजे रामाची झोपण्याची जागा येथे शेज ह्या शब्दाचा अर्थ शय्या असा आहे.

नाशिक प्रांत व शहर मुगलांच्या ताब्यात होते. अशावेळी नाशिक जवळील छोटासा गड घेण्यासाठी औरंगजेबने शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग याला ४० हजार सैन्य, तोफखाना यांच्यासह पाठविले. मोगलांनी गडाला वेढा घातला तेव्हा गडावर ६०० च्या आसपास मावळे होते. मोगलांनी रामशेजवर पहिला हल्ला चढवला आणि मोगल गडाला भिडले, त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला ,त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. त्यानंतर शहाबुद्दीनने वेढा कडक करणे, सुरुंग लावणे, मोर्चे बांधणे, दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढवून हल्ला करणे असे अनेक उपाय केले, पण रामशेजच्या अनुभवी किल्लेदाराने कौशल्याने आणि सावधगिरीने मोगलांचे सर्व मनसुबे उधळून लावले. मग हट्टाला पेटलेल्या शहाबुद्दीनने लाकडी बुरुज उभारून त्यावर तोफा चढवून किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखली. त्यानुसार आजुबाजूची जंगल तोडून लाकडे जमावण्यात आली. त्या लाकडांचा एक प्रचंड बुरूज बनविण्यात आला. मोगलांनी त्यावरून गडावर मारा सुरू केला पण त्याचा फारसा परीणाम झाला नाही. मे १६६२ मध्ये रामशेजचा वेढा फोडण्यासाठी संभाजी महाराजांनी रुपाजी भोसले व मानाजी मोरे यांना ५ ते ७ हजार सैन्यानिशी पाठविले. शहाबुद्दीनने गडाजवळील गणेश गावाजवळ मराठ्यांना रोखले. दोघांमध्ये तुंबळ युध्द झाले, त्यात मोगलांनी माघार घेतली. मराठ्यांनी मोगलांचे ५०० घोडे पकडून नेले. या विजयामुळे किल्ल्यावरील मावळ्यांमध्ये उत्साह संचारला. पण या पराजयामुळे औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला रामशेजला जाण्याची आज्ञा दिली. शहाबुद्दीनने वेढा कडक करून किल्ल्यावर परत हल्ला चढवला. त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला .त्यात राजा दलपतराय दगडांच्या मार्‍याने जखमी झाला ,त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. सलग येणार्‍या अपयशामुळे शहाबुद्दीन वेढा सोडून जुन्नरला गेला. आता वेढ्याची जबाबदारी बहादूरखानावर आली. त्याने किल्ल्यावर हल्ला करण्याची दुसरी योजना आखली. या योजने नुसार मोगलांच्या सैन्यातील एका गटाने तोफा, वाद्ये इत्यादी साहीत्य घेऊन गडाखाली एका जागी जमाव करावा.त्यामुळे या बाजूने मोगलांचा हल्ला होईल या कल्पनेने गडावरील मावळे त्या जागी जमतील. ही संधी साधून मोगलांच्या दुसर्‍या गटाने विरुध्द बाजूने किल्ल्यावर हल्ला करावा. मराठ्यांना या योजनेची आधीच कुणकुण लागली होती. त्यामुळे मराठ्यांनी दोनही बाजूंना सैन्य विभागून मोगलांना सडकवून काढले आणि मोगलांच्या या योजनेवरही पाणी फिरवले. किल्ला जिंकण्यासाठी बहादूरखान काहीही करायला तयार होता. सैन्यातील लोकांनी एक तांत्रिक पकडून आणला. त्याने खानाला सांगितले मला १०० तोळे वजनाचा सोन्याचा साप बनवून द्या. तो मंतरून मी हातात घेईन आणि मग कुठलीही अडचण न येता मी तुमच्या सैन्याला किल्ल्याच्या प्रवेशव्दारा पर्यंत नेईन, मग विजय आपलाच. खानाने त्याच्या म्हणण्या प्रमाणे केले. एके दिवशी तांत्रिकाला आघाडीवर ठेऊन मोगल सेना गडाच्या रोखाने निघाली. ती माराच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी गडावरून गोफणीतून दगडफेक चालू केली.त्यातील एक दगड आघाडीवरच्या तांत्रिकाच्या छातीवर इतक्या जोराने लागला की, त्याच्या हातातील सोन्याचा साप उडाला आणि तांत्रिक खाली कोसळला. हे पाहून मोगल सैन्याचा धीर खचला व त्यांनी माघार घेतली. या पराभवाने औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला वेढा सोडून जाण्याची आज्ञा दिली. या अपमानाने भडकलेल्या खानाने जातांना शहाबुद्दीनने उभारलेला लाकडी बुरुज जाळून टाकला. त्यानंतर औरंगजेबाने कासिमखान किरमाणी या सरदाराला रामशेजवर पाठवले, पण त्यालाही गड घेता आला नाही. अशा प्रकारे एक छोटासा गड पासष्ट महिने लढवून मराठे आणि त्यांचे किल्ले ही काय चीज आहे याची चुणूक मोगलांना दाखवली.
आणि एका दिवसात किल्ला काबिज करून आणतो असे म्हणून जे औरंगजेबाचे मातब्बर सरदार निघाले ते हाती फक्त अपयश घेऊनच परत गेले. आणि असा हा रामसेज एकमेव किल्ला होता ज्याने मोगलांशी जवळजवळ ८ वर्षे सतत झुंज दिली. आणि म्हणूनच या किल्याची मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद करुन ठेवली आहे. आणि ह्या पराक्रमाचे वर्णन आपल्याला मोगलांच्या कागदपत्रातून मिळते. असा हा किल्ला नाशिक पासून जवळ असल्याने एका दिवसात किल्ला आणि जवळ असणारी चामर लेणी (चांभार लेणी) आरामात पाहून होतात. परंतु आम्ही देहेरगड पाहण्याचे योजिले असल्याने आणि वेळे अभावी चामर लेणी न पाहण्याचा निर्णय घेतला.

शनिवारी संध्याकाळी ६ वाजता निघण्याचा आमचा मानस होता परंतु काही कारणास्तव आम्हाला २ तास उशीर झाला. आणि आम्ही साधारणतः ८ वाजता बोरिवली वरून खाजगी वाहनाने प्रवास सुरू केला. रस्त्यात रात्रीच्या भोजनाचा कार्यक्रम असल्याने आम्हाला किल्याच्या पायथ्याला पोचेल पहाटे ४ वाजले. आमच्या जवळील तंबू आम्ही गावच्या मारुती मंदिरात ठोकून २ तास आराम केला. 

गडाच्या पायथ्याला वाहनतळ आणि एक छोटेशे हॉटेल आहे. येथे एक फलक आहे आणि एक मळलेली वाट गडाच्या दिशेन जाताना दिसते. या वाटेने काही अंतर चालत गेल्यावर आपल्याला दगडी पायऱ्या दिसतात. येथून पुढे वर चढत गेल्यावर आपण एक छोट्या गुहेकडे पोचतो. येथे एक शिवलिंग ठेवलेल आहे. शिवलिंगच्या वरच्या बाजूस म्हणजेच गुहेच्या छताच्या बाजूस एक छिद्र आहे. येथून वरुन खाली येणाऱ्या पायऱ्या दिसतात याचा अर्थ ह्या गुहेपर्यंत येण्यासाठी किंवा ही गुहा नसावी येथे एक चोर दरवाजा असावा जेणे करून मुख्य दारवाजाजवळ एखादा शत्रू जर आलाच तर त्याला मध्येच शिकस्त देता येईल त्यासाठी या पायऱ्या असाव्यात. तर पावसाळ्यात या छिद्रातून जे पाणी खाली पडते ते सरळ शिवलिंगावर येते अश्या प्रकारे ही शिवलिंग ठेवलेल आहे. या ठिकाणावरून पाहता हे  छान  वाटते. परंतु वरून  येणारे पावसाचे पाणी आणि गड पाहायला येणारे गिर्यारोहक आणि पर्यटक हे ज्या वेळेस वरुण पायऱ्या पाहायला येतात तेंव्हा त्यांच्या पायाखालचे पाणी हे पायऱ्यांवरून त्या शिवलिंगावर येते. हे फार चुकीचे आहे आणि ह्यावर काहीतरी उपाय योजना करणे गरजेचे आहे. ह्याच गुहसमोरील एका  झाडाखाली अजून एक शिवलिंग दिसून येते. येथूनच एक मंदिर आणि गुफा नजरेस पडते याच गुफेत श्री रामाच वास्तव्य होते. आणि त्यांची शय्या ह्याच गुहेत आहेत. सध्या ह्या गुहेत एक साधू महाराज त्यांची उपासना करत असतात आणि त्यांचे वास्तव्य ह्या गुफेत आहे. गुहेच्या खालच्या बाजूला पाण्याचे एक टाके आहे. यामधील पाणी पिण्यायोग्य आहे. श्रीरामाचे दर्शन घेऊन गुहे समोरच्या तुटलेल्या पायर्‍या आपल्याला उध्वस्त प्रवेशव्दारातून थेट गडावर घेऊन जातात.
वाहनतळा येथून दिसणारा रामशेज चा किल्ला 
रामशेजचा किल्ला चढताना वाटेत दिसणाऱ्या दगडी पायऱ्या 
पहिल्या गुहेपर्यंत पोचताना लागणारी चढण 
पहिली गुफा आणि छिद्रातून पडणारे पाणी 
गुफेसमोरील झाडाच्या खाली असलेल शिवलिंग 
गुफेबाहेरून दिसणारे मंदिर 
मंदिराबाहेर असणारे अवशेष     
गुफेतील श्री रामाचे मंदिर 
गुफेतील श्री हनुमानाची मूर्ती 
गुफेबाहेरून गडावर जाणाऱ्या उद्ध्वस्त पायऱ्या 
उद्ध्वस्त प्रवेशद्वार     
प्रवेशद्वारा जवळील तटबंदी     
गडावर प्रवेश करतो तेथे गडमाथा चिंचोळा आहे. येथून उजव्या बाजूला लांबवर परसरलेला डोंगर माथा आहे. तर डाव्या बाजूला पठार आहे. गडावर प्रवेश केल्यावर गडमाथ्यावर समोरच एक छोटा कमान असलेला दरवाजा आणि त्यातून उतरणारी बांधीव पायर्‍यांची वाट दिसते. या पायर्‍या उतरुन खाली गेल्यावर एक मोठे कोरडे खांब टाके आहे. टाक्याच्या समोरच्या बाजूला दगडी बिंत बांधून टाके संरक्षित केलेले आहे. त्याच बरोबर टेहळाणीसाठी आणि मार करतांना आडोसा (लपण्यासाठी) या भिंतीचा उपयोग होत होता. टाके पाहून गड माथ्यावर येऊन पठाराकडे जाताना वाटेत उध्वस्थ वाड्याचे अवशेष आणि दोन कातळ कोरीव टाकी लागतात. येथून वर जाणारी वाट गडाच्या टोकापाशी घेऊन जाते. परंतु पावसाळा असल्याने आणि गडावर सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली असल्याने खालच दृश्य आम्हाला फारसे पाहता आले नाही. या पठारावर नवीन उभारलेला झेंड्याचा खांब आहे. या झेंड्याला वळसा घालून पुन्हा प्रवेशव्दारापाशी येऊन थोडस पुढे चालत गेल्यावर आपल्याला चुन्याच्या घाण्यासाठी बांधलेला दगडी गोल चर पाहायला मिळतो. त्याच्या उजव्या बाजूने चालत गेल्यास कातळात कोरलेल्या पायर्‍या आणि प्रवेशव्दार आहे . पायर्‍यांनी खाली उतरल्यावर प्रवेशव्दारा समोर थोडी मोकळी जागा आहे. येथे पायर्‍या खोदलेल्या आहेत त्या किल्ला चढतांना आपल्याला जी राम मंदिराच्या बाजूला गुहा लागलेली तीच्या छता पर्यंत जातात. याठिकाणी गुहेच्या छतात छोटे छिद्र आहे. ह्याच छिद्रातून पडणारे पाणी हे वर सांगितल्याप्रमाणे खाली ठेवलेल्या शिवलिंगावर पडते. हे पाहून झाल्यावर पुन्हा  चुन्याच्या घणीजवळून डाव्या बाजूने वर चढून जावे.
प्रवेशद्वारा समोरील कमान 
प्रवेशद्वारा समोरील कमान 
कोरडे खांब टाके 
कमान उतरून येण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या     
पठारावरील पाण्याचे टाक
पठारावरील ध्वजस्तंभ
चुन्याच्या घाणीचा चर 
चुन्याच्या घाणी शेजारील फलक
कातळात कोरलेल्या दगडी पायऱ्या 
कातळात कोरलेल्या दगडी पायऱ्या 
प्रवेशद्वार
पायऱ्या आणि छिद्रातून पडणारे पाणी 
प्रवेशद्वारासमोरील उद्ध्वस्त तटबंदी
येथे गेल्यावर आपण देवीच्या मंदिरापाशी येऊन पोहोचतो. मंदिराच्या समोर एका झाडाखाली गणपतीची पुरातन मुर्ती आहे. मुर्तीच्या समोरच्या भागात वास्तूचे अवशेष आहेत. मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती मूर्तीची स्थापना केली आहे. गजाननाचे दर्शन घेऊन पायवाटेवर येउन गडमाथ्याकडे चढत जातांना डाव्या बाजूला घरांचे अवशेष आहेत. येथून वर चढून जाण्यापूर्वी डाव्या बाजूला असलेल्या अस्पष्ट पायवाटेने चालत गेल्यावर आपण तीन टाक्यांच्या समुहापाशी पोहोचतो. ही टाकी पाहून पुन्हा मुख्य पायवाटेवर परत येऊन गडमाथ्यावर पोहोचल्यावर समोर ३ पाण्याची टाकी खोदलेली दिसतात. चौथे छोटे टाके या टाक्यांच्या काटकोनात कोरलेले आहे. या टाक्यांपर्यंत पाणी आणण्यासाठी आणि टाकी भरल्यावर खालच्या बाजूला असलेल्या टाक्यात पाणी जाण्यासाठी कातळात चर खोदलेले आहेत. टाक्यांच्या पुढे एका उध्वस्त वास्तूचे अवशेष आहेत. हा गडाचा सर्वोच्च माथा आहे.
देवीचे मंदिर
मंदिराबाहेर असणारे अवशेष 
मंदिराबाहेर असणारे अवशेष 
मंदिराबाहेर असणारे अवशेष 
देवीची मूर्ती
देवीची मूर्ती
मंदिरासमोरील महाराजांचा पूर्णाकृती पुतळा
गडाचा सर्वोच्च माथा
पाण्याच टाक
पाण्याच टाक
पाण्याच टाक
पाण्याच टाक
पाण्याच टाक
पाण्याच टाक
पाण्याच टाक
पाण्याच टाक
पाण्याच टाक
गडमाथ्यावरुन पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या टोकापाशी पोहोचतो. येथे उजव्या बाजूला खाली उतरुन गेल्यावर कड्यावर ५ मोठ्या टाक्यांचा समुह आहे. यातील शेवटच्या टाक्या पासुन पुढे चालत गेल्यावर खालच्या बाजूस कड्याच्या टोकाला एक चौरस टाके आहे . हे टाके पाहून पायवाटेने थोडे वर चढून गेल्यावर ३ मोठ्या टाक्यांचा समुह पाहायला मिळतो. या टाक्यांच्या जवळून एक वाट खाली उतरत कड्यापाशी जाते. या ठिकाणी किल्ल्याचा गुप्त दरवाजा आहे . आत उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. आत काट क्प्नात वळणार्‍या वाटेवर दोन कमान असलेले दरवाजे आहेत. मधल्या भागात छ्तावर सुंदर कमळ कोरलेले आहे. हा पूर्ण गुप्त दरवाजा मोक्याच्या जागी दगडात बांधून काढलेला आहे. गुप्त दरवाजा पाहून पायवाटेने पुढे चालत गेल्यावर आपण देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूने आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ पोचतो अश्याप्रकारे एका तासात हा किल्ला पाहून होतो.
गुप्त दरवाजा
गुप्त दरवाजा
छ्तावरकोरलेले सुंदर कमळ
गावांबाहेरून दिसणारा रामशेजचा किल्ला




देहेरगड



पठारावरून दिसणारा देहेरगड

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात देहेर किल्ला आहे. तसा हा किल्ला अनवट वाटेवर आहे असं म्हणता येईल. कारण देहेरगड आणि भोरगड असे दोन किल्ले बाजूबाजूला आहेत. येथील भोरगडावर वरपर्यंत गाडी जाते आणि रस्ता सुद्धा चांगला आहे. परंतु या गडावर समान्य नागरिकांना जाण्यास सक्त मनाई आहे करण या इथे भारतीय वायुदलाने रडार यंत्रणा बसवली आहे. पण देहेर गडावर जाण्यासाठी भोरगड ला जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये एक खिंड लागते येथून पायवाटेने आपण देहेर गडावर जाऊ शकतो. पण आमच्या मते इथून जाण्यासाठी सुद्धा परवानगी नसावी. आणि दुसरी वाट जी आहे ती रामशेज च्या पुढे रासेगावं आहे त्याच्या अलीकडे एक वाट देहेरवाडीकडे जाते या वाटेने आपण देहेरगड पायथ्या जवळ पोचतो. रामसेज या प्रसिध्द किल्ल्याच्या पुर्वेस असणार्‍या देहेरगडाचा उपयोग मुख्यत: टेहाळणीसाठी करण्यात आला असावा. गडावरील पाण्याची टाकं व दगडात खोदलेले पायऱ्या या वरून हा किल्ला खुप प्राचीन असावा.
गडाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या पायर्‍यांच्या मार्गाने उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण देहेरगडावर प्रवेश करतो. प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला पाण्याचे सुकलेल टाक आहे. या टाक्याच्या मागून असलेला पायर्‍यांचा मार्ग आपल्याला गडाच्या पूर्वेला घेऊन जातो. येथे पाण्याची ३ टाकं आहेत; त्यांच्या जवळच उघड्यावर शिवलिंग आहे. गडाच्या दक्षिणेला व पश्चिमेला ३ - ३ जोड टाकं आहेत. गडमाथ्यावर उध्वस्त वास्तूंचे अवशेष आहेत. या गडावर सर्वत्र तिरडा ह्या वनस्पतीची झाडी प्रचंड प्रमाणात आहे. तिरडा ही वनस्पती गौरी पूजानासाठी वापरली जाते.

प्रवेशद्वार
पाण्याच टाक
शिवलिंग
शिवलिंग
पाण्याच टाक
पाण्याच टाक
पाण्याच टाक
पाण्याच टाक
पाण्याच टाक
कातळात खोदलेल्या पायऱ्या

|| हर हर महादेव ||
|| जय भवानी ||
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||
|| जय शंभूराजे ||