शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०२३

सप्तशृंगीगड, मार्कंडेय, रावळ्या आणि जावळ्या

 सप्तशृंगीगड


'सप्तशृंगीगड' पाहण्याचा आमचा मानस तसा फार पूर्वीपासूनचा आहे. कारण नाशिक जिल्ह्यातील अनेक गड फिरताना आपण बऱ्याचवेळा ह्या गडाच्या बाजूने ये-जा करत असतो. पण वेळेअभावी ते साध्य करता येत नव्हत. पण या वेळी मात्र आमचा निश्चय ठाम होता की आधी सप्तशृंगीगड करायचा आणि मग पुढचे किल्ले पहायचे. या नियोजनाप्रमाणे आम्ही शुक्रवारी संध्याकाळी मुंबईतील बोरिवली येथून आमचा प्रवास सुरू केला. आणि शनिवारी पहाटे ५.३० वाजता गडाच्या माचीवर गाडी जाते तिथपर्यंत येऊन पोचलो.
नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगररांगेमध्ये येणारा ‘सप्तश्रुंगी गड’ हा वणीचा डोंगर या नावाने ओळखला जातो. सप्तश्रुंगी हे जगदंबेचे देवस्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली ही देवी सात आदिमातांमधील थोरली माता आहे.
किल्ल्यावर जगदंबा मातेचे अर्थातच वणीच्या देवीचे मंदिर आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायर्‍या आहेत. येथून वरच्या भागात गड आहे. परंतू हा श्रध्देचा भाग असल्यामुळे सध्या गडावर जाण्यास परवानगी मिळत नाही. क्षणाचा विलंब न करता आम्ही देवीच्या दर्शनासाठी गेलो. गर्दी कमी असल्याने पहाटे आम्हाला काही वेळातच देवीचे दर्शन झाले. गडाच्या पायथ्याला असलेल्या नंदुरि गावात येऊन आम्ही सकाळची न्याहारी करून मार्कंडेय किल्याच्या प्रवासाला सुरवात केली.

मार्कंडेय

सप्तशृंगी गडासमोरूनच नजरेस पडणारा किल्ला म्हणजे मार्कंड्या किल्ला, प्रथम दर्शिनी या किल्ल्याकडे पाहताना आपल्याला असा भास होतो की आपण सप्तशृंगी गडावरूनच या किल्ल्यावर जाऊ शकतो. परंतु तसे आपण जाऊ शकत नाही. 
सप्तशृंगी गडावरुन साधारणतः २८-३३ किमी प्रवास करून आपण बाबापूर किंवा मूलनबारी या खिंडीत येऊन पोचतो. येथे भगवान शंकराचे छोटेसे मंदिर आहे आणि एक व्याघ्र शिल्प आहे, या मंदिराला लागूनच गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
या पायऱ्यांच्या बाजूला लोखंडी कुंपण आहे आणि काही ठिकाणी बसण्यासाठी लोखंडी बाक आहेत. परंतु ते सध्या सुस्थित नाहीत. काही अंतर चडून वर गेल्यावर लोखंडी शिडी लावण्यात आलेली आहे. येथे भरपूर माकड आहेत त्यामुळे आपल्या सामानाची काळजी घ्यावी. गडावर चढताना पहिला टप्पा पार पडल्यावर आपण पठारावर येतो, ही गडाची माची आहे.या माचीवर बऱ्याच ठिकाणी आपल्याला मंदिर पाहायला मिळतील, याच माचीवर एक आश्रम सुद्धा आहे. या आश्रमात जेवणाची व्यवस्था होऊ शकते. आश्रम परिसरात खूप झाडे आहेत. आणि त्यांची खूप छान पद्धतीने काळजी घेतली जाते. माचीवरुन बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी असलेल्या वाटेवर दगडात कोरलेल्या पायर्‍या दिसतात. येथून काही अंतरावर कालिका माता मंदिर आहे.या वाटेवरच डावीकडे एका कातळकड्या खाली कातळात कोरलेल्या दोन गुहा दिसतात. त्यांना "ध्यान गुंफा" म्हणतात. येथून वर चढताना उजव्या हाताला बुरुजाचे व डाव्या हाताला तटबंदीचे अवशेष दिसतात. हा पायर्‍यांचा टप्पा संपला की, समोरच सप्तशृंगी गड दिसतो.
तो पाहून , डाव्या बाजूच्या कातळात खोदलेल्या वाटेने बालेकिल्ल्यावर जाता येते. वाटेत एका चौथाऱ्यावर गणपतीच्या मूर्तीची स्थापना केलेली दिसून येते येथे पहिल्या टप्प्यावर एका घुमटी खाली कोरलेले टाकं पाहाता येते. या टाक्याला "कमंडलू तीर्थ" म्हणतात. या टाक्यात पिण्याचे पाणी बारामाही असते. याच बाजूला एक बांधकाम केलेले आहे आणि याच्या मागच्या बाजूलाएक शिल्प आणि त्रिशूळ आहे.
येथून पुढे दुसर्‍या टप्प्यावर एका रांगेत खोदलेली तीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. त्यांच्या बाजूलाच एक सुकलेल टाक आहे. येथे एका झाडाखाली नागाचे शिल्प आणि शिवलिंग आहे. येथून गडाच्या सर्वोच्च टोकावर मार्कंडेश्वराच मंदिर आहे. मंदिरात मार्कंडेय ऋषींची मूर्ती व शिवलींग आहे. मंदिराच्या बाहेर नंदी आहे आणि येथूनच सप्तशृंगी गड, रवळ्या जावळ्या, धोडप हे किल्ले दिसतात.
हे सगळ पाहून आम्ही गड उतरून रावळ्या जावळ्या किल्याच्या प्रवासाला सुरवात केली.

जावळ्या

बाबापूर खिंडीतून कण्हेरगड च्या दिशेने जाताना ३ किमी अंतरावर उजव्या बाजूला कळवण नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावातून एक वाट रावळ्या जावळ्या गडावरील माचीवर जाते. या माचीवर एक वस्ती आहे या वस्तीला तिवारी वस्ती म्हणून संबोधले जाते.
आमचा रात्रीचा मुक्काम माचीवर होता, या वस्तीच्या थोडस आधी काही पाण्याची टाक आहेत आणि हे पाणी पिण्यासाठी वापरता येते  म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे तंबू ठोकून रात्रीच्या जेवणाची तयारी करायला सुरवात केली.


वस्तीच्या दिशेने उभे राहिल्यास उजव्या बाजूला असणारा किल्ला म्हणजे रावळ्या आणि डाव्या बाजूला असणारा किल्ला म्हणजे जावळ्या. पहाटे लवकर उठून आम्ही जावळ्या किल्ल्याला आधी भेट देण्याचे ठरवले. वस्ती समोरील गडाच्या सोंडेवरुन किल्ला उजव्या हाताला ठेऊन एक वाट डाव्या बाजूने गडावर जाते. या वाटेवर काही अंतर चालत गेल्यावर काही गुहा आहेत. येथूनच पुढे ही वाट गडाच्या दुसऱ्या सोंडेवर जाते. आणि एक वाट खालच्या दिशेने येऊन ह्या वाटेल मिळते.
सोंडेवरून वर गेल्यास कड्यात कोरलेल्या पायर्‍या आहेत. थोडे चढून गेल्यावर कातळात कोरलेला किल्ल्याचा दरवाजा लागतो. त्याच्या उजव्या भिंतीवर शिलालेख कोरलेला आहे. पायर्‍या चढून गेल्यावर आपण दरवाजाच्या दुसर्‍या टोकाशी पोहोचतो. दरवाज्यातून वर आल्यावर एक वाट वर जाते. दुसरी वाट डावीकडे वळते. इथे कातळात कोरलेल्या गुहा आहेत. या गुहेत एक पाण्याचे टाके आहे. हे पाहून परत माथ्यावर जायचे. वर चढून गेल्यावर एक वाट समोर टेकाडावर जाते. ही वाट किल्ल्याच्या दुसर्‍या टोकाशी जाते. या टोकावरुन डावीकडे खाली गेले की कड्यात खोदलेली खांब टाकी आहेत. त्याच्या समोरच पाण्याची दोन कातळात खोदलेली टाकी सुध्दा आहेत. या पैकी कोणत्याही टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या शिवाय किल्ल्यावर घोड्याच्या पागा आहेत. जवळ्या पाहून पुन्हा आल्या वाटेने माचीवरील तिवारी वस्ती जवळ आलो. आणि रावळ्या किल्ला पाहण्यासाठी प्रस्थान केले.
रावळ्या

वस्तीच्या मागच्या बाजूच्या जंगलामधून डावीकडे रवळ्यावर जाते. वाट सहजच सापडणारी नाही. थोडीशी शोधावी लागते. पण एकदा सापडल्यावर १५ मिनिटांतच आपण एका घळी पाशी पोहोचतो. वाटेत उजवीकडे कड्यामध्ये एक गुहा आहे. या घळीतून "चिमणी क्लाईंब" करुन वरच्या झाडापाशी जायचे. या झाडाच्या समोरच रवळ्याचा तुटलेला कडा आहे. या कड्यावरुनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. हा कडा चढण्यासाठी दोर असणे आवश्यक आहे. ज्याला गिर्यारोहणाचे तंत्र अवगत असेल तो सहजपणे रोप न लावता सुध्दा येथून चढू शकतो.आमच्याकडे दोर नसल्याने आम्ही कामरेच्या कापडी पट्याचा वापर करून गिर्यारोहण केले. वर गेल्यावर समोरच एक भगवा झेंडा आहे. रवळ्याच्या माथ्यावर काही अवशेष नाहीत. दुसर्‍या टोकाला पाण्याची सुकलेली टाकी आहेत. हे सर्व पाहून आम्ही गड उतरण्यास सुरवात केली.|| हर हर महादेव ||
|| जय भवानी ||
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||
|| जय शंभूराजे ||