रविवार, १ जानेवारी, २०२३

सागरगड उर्फ खेडदुर्ग

google.com, pub-1392591090390469, DIRECT, f08c47fec0942fa0

 सागरगड उर्फ खेडदुर्ग


सागरगड उर्फ खेडदुर्ग या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला मुंबई पासून १२० किमी अंतरवर अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला असावा. अलिबाच्या समुद्रकिनाऱ्यापासून किमान ८ किमी दूर हा किल्ला कोणी आणि केव्हा बांधला याची इतिहासात नोंद नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुरदृष्टीने सागरी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला. त्यावेळी महाराजांनी  गडावरुन खांदेरी आणि उंदेरी ही बेटे पहिली आणि इंग्रज व सिद्धी यांच्यावर वचक बसविण्यासाठी खांदेरी आणि ऊंदेरी हे किल्ले बांधण्याची योजना आखली.  तसेच कुलाबा आणि सर्जेकोट हे सुद्धा किल्ले बांधण्यात आले. इ.स. १६६५ मध्ये शिवाजी राजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे २३ किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडचा (खेडदूर्ग) समावेश होता. आग्र्‍याहून सुटका झाल्यावर महाराजांनी सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर माजलेल्या अंदाधुंदीत सागरगड सिध्दीने ताब्यात घेतला. पण कान्होजी आंग्रे, कुलाब्याचे भिवाजी गुजर, आरमार प्रमुख सिधोजी यांनी १६९८ साली सिध्दीकडून किल्ला जिंकून घेतला. छत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्या वादात कान्होजी आंग्रे ताराराणीच्या बाजूस होते. पण १७१३ मध्ये बाळजी विश्वनाथ पेशवे यांनी मुसद्देगिरीने छ. शाहू व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणला. त्यावेळी १६ किल्ले कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यात सागरगडचा समावेश होता. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडचा ताबा येसाजीकडे गेला. मानाजी आंग्रे व येसाजी आंग्रे या भावांच्या भांडणात पोर्तुगिजांनी मानाजीची बाजू घेतली, मानाजीने येसाजीचा पराभव केला. त्यावेळी सागरगडाचा ताबा त्यांच्याकडे आला. इ.स. १७३८ मध्ये संभाजी आंग्रेने सागरगड मानाजी कडून जिंकून घेतला. इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला रम्य निसर्ग व अल्हाददायक वातावरण पाहून जनरल फूलर व काही इंग्रज अधिकार्‍यांनी येथे विश्रामधामे बांधली होती. अश्याप्रकारे या गडाचे महत्व इतिहासात नमूद केलेले आहे.


गडावर जण्यासाठी आम्ही रूळे गावातील गणेश मंदिराजवळ आमचा रात्रीचा मुक्काम केला. पहाटे लवकर उठून गावकऱ्यांकडून माहिती घेऊन आम्ही गडाच्या दिशेने आमचा पायी प्रवास सुरू केला. गडावर जाण्यासाठी खंडाळे या गावातून सुद्धा जाता येते. ह्या गावातून गेल्यास सिद्धेश्वर धबधब्याच्या दिशेने एक पायवाट सिद्धेश्वर मठाजवळ घेऊन जाते. ह्या वाटेने उभी चढण चढून जावे लागते. परंतु आमचा मुक्काम हा रूळे गावाजवळील गणेश मंदिराजवळ होता. येथे तंबू लावण्यासाठी प्रशस्थ जागा आहे. मंदिरासमोर मोठे क्रीडांगण आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे. क्रीडांगणसमोरून एक पायवाट गडाच्या दिशेने जाते. काही अंतर चालून गेल्यावर ही वाट एका कच्च्या रस्त्याला जाऊन मिळते, हा रस्ता  वेडीवाकडी वळणे घेत गडाच्या माचीवरील दत्त मंदिराजवळ पोचतो.


या रस्त्यावरून सिद्धेश्वर मठातील सामान ने-आण करण्यासाठी एक जीप ये-जा करताना दिसते. रस्त्याची अवस्था ही चांगली नसल्याने तसेच अतिशय वेडी-वाकडी वळणे आणि कठीण चढण-उतरण असल्याने इतर लहान खाजगी वाहने या रस्त्यावरून जाऊ शकत नाहीत. वरच्या गावातील काही ग्रामस्थ आपल्या खाजगी दुचाकीने थरारक असा प्रवास करत असतात. परंतु ग्रामस्थांच्या मागणीकडे शासनाने आणि स्थानिक राजकीय नेत्यानी नेहमी प्रमाणे पाठ फिरवल्याची कथा गावकरी मांडताना दिसतात. 
दत्त मंदिराजवळ काही घरे आहेत तसेच गावात तुम्हाला जेवणाची आणि नाष्टयाची व्यवस्था होऊ शकते. तसेच माचीवरील गावकरी हे गवळी समाजाचे असल्याने शुद्ध तूप सुद्धा तुम्हाला विकत मिळू शकते. मंदिराच्या मागच्या बाजूने एक वाट गावात जाते. गावात पोचल्यावर इथे कोणालाही विचारल्यास गडावर जाण्यासाठी असणारी पायवाट तुम्हाला दाखवण्यात येते. काही अंतर चालून गेल्यावर एक पत्र्याची शेड असणारे मंदिर दिसून येते. या मंदिरात एक शिवलिंग आणि काही देवाच्या मूर्ती आहेत.


या मंदिराच्या बाजूने एका पायवाटेने चालत जावे. काही अंतर चालत गेल्यावर एक पाण्याचे स्त्रोत असलेले छोटेसे बांधीव डबक नजरेस पडते आणि पुढे एका झाडावर गडाच्या दिशेने जाण्यासाठी लावलेला दिशा दर्शक फलक दिसून येतो.



काही नंतर चालून गेल्यावर एका वळणावर तुम्हाला गड आणि गडाशेजारील वानर लिंगी असलेला सुळका नजरेस पडतो. काही अंतर चालून गेल्यावर आपण गडाच्या घळीत येऊन पोचतो येथे एक मंदिर असल्याची खुण नजरेस पडते. या घळीतून एक मोठी वाट डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने उभी चढण असणारी वाट गडावरील प्रवेशद्वाराजवळ जाऊन पोचते.










प्रवेशद्वारातून आत  गेल्यावर आपल्याला दगडी पायऱ्या दिसून येतात, इथून पुढे डाव्या बाजूला एक सुकलेल पाण्याच पात्र दिसून येते आणि इथूनच समोर असलेली तटबंदी नजरेस पडते.





येथून एक पायवाट उजव्या दिशेने जाते. या वाटेने गेल्यास आपल्याला ४ मीटर उंचीची असलेली ५ बुरुजांची तटबंदी बाहेरच्या बाजूने पाहता येते. या तटबंदिला एक झरोखा देखील आहे. तटबंदी सुस्थित असल्याने गडाची शोभा वाढवते. हे पाहून पुन्हा सुकलेल्या पाण्याच्या पत्राजवळ याव इथून एक वाट गडाच्या बलेकिल्यात प्रवेश करते. आत जाताना पुन्हा दगडी पायऱ्या नजरेस पडतात. येथून उजवी वाट धरल्यास आपण तटबंदीच्या आतल्या बाजूने जातो येथून पुन्हा आपल्याला तटबंदिला असलेला झरोखा पाहता येतो. सरळ तटबंदिवरून चालत गेल्यास काही अंतरावर एक चोर दरवाजा असल्या सारखा काही भाग दिसून येतो. येथून गडावरील गडेश्वर मंदिर नजरेस पडते. मंदिराच्या दिशेने चालत गेल्यास वाटेत एक नंदीचे मूर्ती दिसते येथेच खालच्या बाजूला एक व्याघ्रमुखी पाण्याचे कुंड आहे.



















इथून वर चढून गेल्यास आपण गडेश्वर मंदिरात पोचतो. पत्र्याच्या या मंदियारात महिषासूरमर्दिनी, गणपती व शिवलींग यांच्या दगडात कोरलेल्या मुर्त्या आहेत.






मंदिर पाहून झाल्यावर मंदिराच्या खालच्या बाजूला एक गौमुखी पाण्याचे कुंड आहे. या गोमुखातून पाण्याची संतत धार वाहत असते. कुंडाच्या पुढे थोडस पुढे वर चढून गेल्यावर एक समाधी आणि इंग्रजानी बांधलेल्या विश्राम गृहाचे अवशेष पाहायला मिळतात. याच्या मागच्या बाजूला पाण्याचे एक टाक आहे आणि समोरच उद्ध्वस्त दीपस्तंभ आहे. येथील समोरील तटबंदी वरुन समोरच्या माचीकडे चालत जाताना दगडी पायऱ्या दिसतात. येथून गडाच्या बाजूला असलेला वानर लिंगी सुळका दिसून येतो.





















वानरलिंगी पाहून पुन्हा मागे येताना काही अवशेष आणि तटबंदी पाहायला मिळते. गडावरील उंच भागात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे. 






ही पाहून पुढे बालेकिल्यात एका बुरुजावर एक तोफ ठेवलेली आहे. आणि काही गडाचे अवशेष सुद्धा येथे आहेत. हे पाहून खाली आल्यास येथे होळीचा माळ आहे. आणि पुढे चुन्याचा घाणा आहे. हे सर्व पाहून गडफेरी पूर्ण करून आपण पुन्हा प्रवेशद्वारजळ येतो. 










येथून पुन्हा आपण गडावरील गावात पोचतो. गावकाऱ्याना विचारून आपण सिद्धेश्वर मठाच्या दिशेने यावे. मठ पाहून येथूनच खाली उतरण्यास सुरवात करावी. ३०-४५ मिनिटात आपण खाली येतो. काही यानंतर मागे चालत आपण पुन्हा रूळे गावातील गणेश मंदिराजवळ येतो.


|| हर हर महादेव ||
|| जय भवानी ||
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||
|| जय शंभूराजे ||