Monday, December 20, 2021

TREK TO GAMBHIR GAD

गंभीरगड 

तालुका डहाणु, पालघर जिल्हा आणि दादरा नगर हवेलीच्या सीमेवर गंभीरगड हा किल्ला आहे, आजूबाजूचा परिसर हा दाट जंगलाने वेढलेला आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी बोईसर हे पश्चिम रेल्वे वरील सर्वात जवळचे स्थानक आहे.

आम्ही मात्र आमच्या खाजगी वाहनाने बोरिवली वरून प्रवासाची सुरवात केली. साधारणतः 111 किमी हा प्रवास आम्ही 3 तासात पूर्ण करून गडाच्या पायथ्या जवळील गावात म्हणजेच पाटीलपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळे जवळ येऊन पोचलो. मध्यरात्री झाली असल्यामुळे गाव शांत झोपला होता आणि शाळेच्या सदनाला टाळे लावले असल्यामुळे आम्हाला तंबु कुठे लावावा हा प्रश्न होता परंतु आमची चाहुल लागल्याने शाळे समोरील एका घरातुन एक गृहस्थ बाहेर आले आणि त्यांनी आमची चौकशी केली आणि आम्ही गडावर जाण्यासाठी आलो आहोत याची खात्री झाल्यावर आम्हाला शाळेचे सदन उघडून दिले आणि आम्ही तेथे आमचा मुक्काम केला.

परंतु तुमच्याकडे कडे जर चांगले तंबु असतील तर बाजूच्या फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे जिथे रस्ता संपतो तिथेही मुक्काम करू शकता फक्त तुम्हाला तिथे सकाळचा चहा मिळणार नाही त्याची व्यवस्था तुम्हाला स्वतः करावी लागेल. गावात चहा व्यतिरिक्त तुम्हाला नाष्टा मिळणे थोडे कठीणच आहे. गावात एक छोटेसे दुकान आहे पण तिथे तुम्हाला थोडेफार खाण्याचे पदार्थ मिळतील म्हणून जेवणाची आणि इतर खाद्य पदार्थांची सोय तुम्ही स्वतः करावी.

जिथे रस्ता संपतो त्याच्या डाव्या बाजूने एक वाट जाते या वाटेवरून 5 मिनिटे चालत गेल्यावर समोर एक बांधीव विहीर नजरेस पडते आणि त्याच्या बाजूने नदीचे पात्र आहे. ह्या विहिरीजवळ पोहचण्या आधी डाव्या बाजूने एक वाट जाते या वाटेवरून थोडस पुढे गेल्यावर बाजूच्या फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे एक पडीक शिवमंदिर नजरेस पडते. हे मंदिर पाहुन झाल्यावर पुन्हा त्याच वाटेने मागे यावे आणि विहिरी समोरून नदीचे पात्र ओलांडुन पायवाट धरावी. 
शिवमंदिर
पडीक शिल्पातील हात
सोंडेवरून दृष्टीस पडणारा गडमाथा
तुमच्या डाव्या बाजूला नदीचे पात्र आणि उजव्या बाजूला कुंपण आणि कुंपणाशेजारून तुमची पायवाट असेल. नदीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा तुम्हाला कुंपण नजरेस पडेल . या वाटेवरून 5 मिनिटे चालत गेल्यावर हि वाट उजव्या बाजूच्या कुंपणा शेजारून गडाच्या दिशेने जाण्यास सुरवात होते आणि हीच ती गडाची सोंड ह्या सोंडे वरून वर गेल्यावर एक लोखंडी मचाण नजरेस पडते. लोखंडी मचाणापर्यंत पोचताना तुम्हाला एक ढासळलेला बुरुज नजरेस पडतो. इथून तुम्हाला गडाचा सर्वोच्य माथा नजरेस पडतो. 
ढासळलेला बुरुज


सिंदुर लावलेला खडक

पुढे सरळ चालत गेल्यावर एक दरवाज्याचे अवशेष काही पायऱ्या आणि सिंदुर लावलेला एक खडक आणि तिथेच खाली एक शिल्प आढळते.
 
दरवाज्याचे अवशेषदरवाज्याचे अवशेषशिल्प
ह्याच सिंदुर लावलेल्या खडका जवळुन एक वाट गडाच्या मधल्या घळीत पोहचते. आणि डाव्याबाजूने वर गेलात तर हि वाट निसरडी आहे आणि ह्या बाजूने तुम्हाला पाण्याचं टाकं पाहायला मिळेल. आणि ह्याच बाजूने जर गडावर गेलात तर तुम्हाला एक लांब ढासळलेला बुरुज दिसेल. ह्या बुरुजावरून गडाच्या उत्तर दिशेने गेलात कि एक लांब गुहा पाहावयास मिळते आणि खालील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे गडाच्या एका मोठ्या भागाची पडझड झालेली दिसते. ती अश्या प्रकारे झाली आहे कि तिथे एक नेढं असल्याचा भास होतो. हे पाहुन झाल्यावर पुन्हा ह्याच वाटेने मागे यावे आणि गडाच्या दुसऱ्या बाजूने चालण्यास सुरवात करावी. 
पाण्याचं टाक
ढासळलेला बुरुज
लांब गुहा
नेढ्याचा भास

ह्या वाटेने जाताना तुम्हाला एक मोठा सपाट खडक नजरेस पडेल थोडे अंतर चालत गेल्यावर तुम्हाला घळीत खालून येणारी वाट मिळेल. आणि ह्याच ठिकाणी एक वाट गडाच्या समांतर गडाच्या माथ्यावर घेऊन जाईल आणि वर जाणारी वाट तुम्हाला गडाच्या मधल्या माथ्यावर घेऊन जाईल. ह्या वाटेने वर गेल्यावर थोडा अरुंद गड माथा आहे. इथे एक औदूंबराचे झाड आहे आणि खाली खोल दरी नजरेस पडते. ह्या ठिकाणी एखादा चोर दरवाजा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
अरुंद गडमाथा आणि औदुंबराचे झाड
ह्याच ठिकाणाहून उजव्या बाजूस एक बुरूज सुद्धा आहे. गडावर जंगल असल्याने ज्या बाजुने तुम्ही वर चढुन आलात तो परिसर दिसत नाही पण जर वातावरण चांगले असेल तर महाराष्ट्र आणि गुजरात ह्यांच्या सीमेवरील प्रदेश नजरेस पडतो. ह्याच गड माथ्यावरून खाली न उतरता माथ्यावरील पायवाटेने डाव्याबाजूने रानातुन वाट काढत पुढे गेल्यास तुम्ही एका बुरुजावर येता. ह्याच बुरुजाच्या खाली अजून एक बुरुज आहे आणि ह्या बुरुजावरून आपल्याला आजूबाजूचा संपूर्ण प्रदेश नजरेस पडतो. 

एका खाली एक असे दोन बुरुज

पुढे सरळ थोडस वर चढुन गेल्यावर एक पाण्याचं टाकं नजरेस पडते. 
बुरुजावरून चालत जावे


पाण्याचं टाक
मधुन भेग असलेला मोठा खडकपुढे वर गेल्यावर छोटासा मोकळा भाग येतो इथे एक मोठा खडक आहे ह्याला मधूनच एक मोठी भेग आहे. इथून पुढे चालत गेल्यावर खडकामध्ये एक मंदिर आहे. ह्या मोकळ्या जागेच्या उजव्या बाजूने जंगलातुन एक वाट पूढे जाते आणि इथे सुद्धा एक छोटे मंदिर आहे इथून पूढे वर गेल्यावर एक मंदिर असावा ह्याच्या खुणा आढळतात. तिथे एका खडकावर त्रिशूळ काढलेले दिसुन येते.

मंदिर
मंदिराचे अवशेष
मंदिर
मंदिराचे अवशेष
 
त्रिशुळ काढलेल्या खडकाच्या डाव्या बाजूने वर चढुन गेल्यावर आपण गडाच्या सर्वोच्य माथ्यावर येऊन पोहचतो. गड माथ्यावरून गडाच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर नजरेस पडतो. आलेल्या मार्गाने गड उतरण्यास सुरवात करावी. गडाच्या मधल्या भागात दोन पाण्याची टाक आहेत एका टाकीतले पाणी पिण्यायोग्य आहे इथे जाताना सरळ उभा खडक चढुन वर जावं लागत. थोडीशी अरुंद जागा असल्याने काळजी घ्यावी. ह्याच टाकीच्या बाजूला अजून एक पाण्याचं टाक आहे. ह्या ठिकाणी आपण सहज पोहचु शकतो. हे पाहुन झाल्यावर आपण गड उतरू लागतो मधल्या घळीतून खाली उतरून आपण पुन्हा सिंदुर लावलेल्या खडकापर्यंत पोहचतो. त्यानंतर येते लोखंडी मचाण आणि मग सोंडेवरून खाली उतरून सरळ पुन्हा आपण बांधीव विहिरीजवळ येतो. 
गडमाथ्यावरील स्थानिक रहिवाशी
गडमाथ्यावर आलेले पाहुणेमध्य भागातील दोन पाण्याच्या टाक्या
मध्य भागातील दोन पाण्याच्या टाक्या


इथेच पुढे वाहत्या पाण्याचा छोटेखानी धबधबा आहे गावातील लहान मुले इथे पोहण्याचा आनंद घेताना नजरेस पडु शकते आपणही येथे पोहण्याचा आनंद घेऊन थोडासा क्षीण कमी करू शकतो. अश्या प्रकारे किमान 5-6 तासात हा संपूर्ण गड पाहुन परतीचा प्रवास सुरु होतो.
छोटेखानी धबधबा

No comments:

Post a Comment