शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

तळगड, कुडा लेणी, घोसाळगाड, बिरवाडी, आवचितगड

 तळगड

रायगड जिल्ह्यात रोह्या च्या आजूबाजूच्या डोंगररांगेत असणारा हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारात येतो.  हा किल्ला कुंडलिका नदी समुद्राला जेथे मिळते त्या मांदाड खाडीवर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. प्राचीन काळी कुंडलिका नदी मार्गे कोकणातील बंदरात उतरणारा माल घाटावर जात असे. व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला महत्वाचा होता म्हणूनच पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी १२ किल्ले स्वत:कडे ठेवले. त्यामध्ये तळगड हा एक होता. यावरूनच या किल्ल्याचे महत्व आपणास समजते. इ.स.१६४८ मध्ये शिवाजी महाराजांनी तळागड आदिलशहाकडून जिंकून घेतला. इ.स. १६५९ मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्दीने तळागडाला वेढा घातला होता. पण अफजलखानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यावर सिद्दीने वेढा उठवला. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्दीकडे गेला. इ.स. १७३५ मध्ये पहील्या बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. पुढे १८१८ मध्ये जनरल प्राथरने हा किल्ला जिंकला.

साधारणतः मुंबई बोरिवलीवरून आम्ही आमचा प्रवास सुरू केला. आणि पहाटे ४.१५ वाजता आम्ही गडाच्या पायथ्याला पोचलो. परंतु गडावर आणि गडाच्या पायथ्याला राहण्याची व्यवस्था नसल्याने जवळच तळगड गावात चंडिका देवीचे मंदिर आहे. मंदिर प्रशस्थ आहे म्हणून आम्ही काही वेळ तेथेच आराम केला. 

हा किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे आणि याचा घेरापण लहान आहे. परंतु किल्ल्याचे बरेच अवशेष सुस्थित आहेत. तसेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे ह्या किल्ल्याची देखभाल आणि उत्खनन करण्यात येत आहे. आणि या साठी काही नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहेत. तसेच गडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर उभारणीचे काम सुरू आहे आणि या इथे किल्ले प्रेमीना तसेच पर्यटकाना राहण्याची आणि जेवणाची सोय करून देण्यात येणार आहे.

गडाच्या पायथ्याजवळ थोडी अरुंद अशी जागा आहे तिथे २-३ लहान वाहने उभी राहु शकतात इथूनच तळगड किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट आहे. काही अंतर वर छडून गेल्यावर इथे एक तोफ ठेवलेलली आहे. इथून तळगड गावचा परिसर दिसून येतो. इथून पुढे वर चढून गेल्यावर दगडी पायऱ्या लागतात आणि नजरेच पडतो तो हनुमान दरवाजा, इथे उजव्या बाजूला कातळात भगवा सिंदूर लावलेली हनुमानाची मूर्ती दिसून येते. बाजूलाच एक शरभ शिल्प आहे. हनुमान दरवाजाच्या उजव्या बाजूला एक टाक आणि छिद्र आहे. इथून पुढे वर गेल्यावर डाव्या बाजूला तटबंदी आणि दगडी पायऱ्या आहेत. इथे एक माचीवर ३ तोफा खाली ठेवलेल्या दिसून येतात. आणि इथूनच गडावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या दिसतात. 

गडावर जाताना डाव्या बाजूची तटबंदी अजूनही सुस्थितीत आहे. पायऱ्या वरुन जाताना डाव्या बाजूला एक छोटीस छिद्र दिसून येत. या इथे चोर दरवाजा असण्याची शक्यता आहे. इथेच एक अर्ध गोलाकार बुरूज आहे. इथे सुद्धा एक तोफ दिसून येते. आणि हाही बुरूज सुस्थितित आहे. काही पायऱ्या वर चढून गेल्यावर आपण गड माथ्यावर पोचतो. इथे उजव्या बाजूला मंदिराचे अवशेष आणि दुमजली तटबंदी दिसून येते. थोड्याच अंतरावर मंदिराचे जोत व ३ पाण्याची टाकी आढळतात. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर कातळात खोदलेली सात पाण्याची टाकी त्याच्या पुढे लक्ष्मी कोठार नावाची वास्तू पाहायला मिळते. इथे एक शिवमंदिर आहे. पुढे उत्तरेकडे चालत गेल्यावर टोकावर बुरुज आहे. ह्या बुरुजच्या दिशेने जाताना आपल्याला राजगड किल्याची आठवण येते करण बुरुजाची बांधणी ही राजगड किल्याच्या तटबंदिशी मिळतीजुळती आहे. ह्या तटबंदी वरून तटबंदीच्या मधल्या भागात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. इथे उत्खनन करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे अजून बरेच अवशेष इथे मिळण्याची शक्यता आहे. इथून पुन्हा गड माथ्यावर आल्यावर अनेक ठिकाणी घरांचे आणि वाड्यांचे अवशेष आढळतात. हे सगळ पाहून पुन्हा प्रवेशद्वाराने गड उतरण्यास सुरवात करावी.

कुडालेणी 

तळगड पाहून झाल्यावर आम्ही कुडालेणी पाहण्यासाठी निघालो. साधारणतः १४.९ किमी अंतरावर तळा मुरुड रोडवर कुडालेणी ह्या प्रसिद्ध बौद्ध लेणी आहेत. या लेणी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. येथील शिल्प हे वेगवेगळ्या काळात कोरलेली असल्याची माहिती आहे.घोसळगड

कुडालेणी पाहून झाल्यावर साधारणतः १२.९ किमी अंतरावर तळा मुरुड रोडवरून जाताना खंडीचा पुल ओलांडल्यावर उजव्या बाजूला एक रस्ता रोहया कडे जातो ह्या मार्गावर घोसाळे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. 

घोसाळगड हा किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. १६व्या शतकात हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता इस १६४८ मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. ‘‘रघुनाथ बल्लाळ(कोरडे) सबनीस सात पाच हजार मावळे खळक पाइचे घेऊन राजापुरीवर चालिले त्यांनी जाऊन राजापुरी पावेतो तळे, घोसाळे कुल देश मारुन सरद दरियाकिनारा मोकळा केला’’ असा उल्लेख सभासद बखरीत आहे. शिवरायांनी घोसाळगडचे नाव ‘वीरगड’ ठेवले इ.स १६५९ मध्ये सिद्दीने घोसाळगडला वेढा घातला, पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्दी वेढा उठवून निघून गेला. त्यानंतर सिद्दी, आंग्रे, मराठे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. इस १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने हा किल्ला जिंकून घेतला.

घोसाळे गावात गडाच्या पायथ्याला श्री गणेश मंदिर आहे. ह्या मंदिराच्या मागच्या बाजूस घोसळगड किल्याचा फलक लावलेला आहे. इथूनच गडावर जाण्यास वाट आहे. 

थोडीशी उभी चढण जाताना वाटेत आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात आणि काही यानंतर चालून पुढे गेल्यावर आपण गडाच्या पडक्या प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश करतो. प्रवेशद्वाराजवळच  आपल्याला २  शरभ शिल्प पाहायला मिळलात. प्रवेशद्वारा जवळची तटबंदी सुस्थितीत आहे. ह्या प्रवेशद्वारा जवळ छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे फलक लावलेला आहे. ह्या प्रवेशद्वारासमोरच्या तटबंदी खाली खांबटाक आहे आहे आणि एक चोर दरवाजा पाहायला मिळतो.  इथून वर पोहचल्यावर आपला थेट घोसाळगड माचीवर प्रवेश होतो. उजवीकडे किल्ल्याची माची आहे. माची चांगली तटा बुरुजांनी संरक्षित आहे. काही ठिकाणी तटामधील शौचालये देखील दिसतात. शेवटच्या टोकाला बुरुज आहे, इथून घोसाळगड बालेकिल्ल्याचे भेदक दर्शन होते, माची पाहून पडझड झालेल्या द्वाराच्या अवशेषापाशी परतायचे आणि डावीकडची बालेकिल्ल्याची वाट धरायची.

थोडासा उंचवटा पार केला की आपण बालेकिल्ल्याच्या कड्यापाशी पोहचतो., पण वर जाणारी मुख्य वाट मागच्या बाजूने आहे. तत्पूर्वी डावीकडे काही जमिनीत खोदलेली पाण्याची टाकी दिसतात. त्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. या बाजूने बालेकिल्ल्याच्या डोंगराला वळसा देखील घेता येतो. उजवीकडच्या वाटेवर देखिल खालच्या बाजूस एक पाण्याचे टाके आहे. आपण मात्र थोडेसे वर जाऊन कडा डाव्या हाताला ठेवून पुढे निघायचे. वाटेत कड्यात खोदलेल्या काही गुहा आढळतात. एके ठिकाणी दरीमध्ये एक खांबटाके खोदलेले आहे. यासाठी थोडे खाली उतरुन जावे लागते. ते पाहून पुन्हा मुख्य वाटेला लागायचे. थोड्याच वेळात आपण बालेकिल्ल्याच्या मागील बाजूस पोहोचतो. इथेच एक तोफ उघड्यावर पडलेली दिसते. या तोफेच्या समोरुन एक वाट बालेकिल्ल्यावर जाते. वाट निसरडी असल्याने जरा जपूनच जावे लागते. बालेकिल्ल्यावरुन संपूर्ण परिसर नजरेस पडतो. बालेकिल्ल्यावर अवशेष नाहीत. बालेकिल्ल्याला घोसाळगड माचीवरुन प्रदक्षिणा मारून पुन्हा प्रवेश द्वाराजवळ येऊन गड उतार व्हावे.


बिरवाडी 

घोसळगड पाहून आम्ही पुढे बिरवाडी किल्ला पाहण्यासाठी निघालो. हे अंतर सुमारे ३१ किमी आहे. गावातून किल्ल्यावर जातांना वाटेतच भवानी मातेचे प्रशस्त मंदिर लागते. मंदिरापर्यंत जाण्यास सुमारे १०० पायर्‍या बांधलेल्या आहेत .देवळाच्या प्रांगणात तोफ ठेवलेली आहे. मंदिराच्या मागील बाजूस शिवरायांचा ६ फुटी पुतळा उभा आहे. येथून थोडे वर चढल्यावर आपण एका सुटावलेला बुरूजापाशी येऊन पोहचतो. बुरुजापासून एक वाट उजवीकडे वळते ,ही वाट संपूर्ण किल्ल्याला वळसा घालुन गडावर पोहचते. वाटेत एका ठिकणी खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. त्याला ‘घोड्याचे टाके’ म्हणतात. किल्ल्याचे वैशिष्ट्य असे की, किल्ल्याच्या चहुबाजूस तटबंदी विरहीत ७ बुरुज आहेत. गडाच्या या मागील बाजूस गडाचे सुबक असे पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार आहे.आजही हे बर्‍यापैकी शाबूत आहे. प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर डावीकडे पाण्याची ३ टाकी आहेत. येथुन पुढे गेल्यावर एक दगडी भांड दिसते.त्याच्या पुढे अजून एक टाक आहे.या ठिकाणाहून परत ३ टाक्यांपाशी येऊन, येथून थोडे वरच्या बाजुस गेल्यावर आपण थेट बालेकिल्ल्यातच प्रवेश करतो. गडमाथ्यावर पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. गड छोटा असल्याने तो फिरण्यास अर्धातास पुरतो.अवचितगड

एका दिवसात ३ किल्ले आणि कुडा लेणी करून आम्ही रात्री जेवणाचा कार्यक्रम रोहयात केला. रोहयात तुम्हाला जेवणासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत. ह्या भटकांतीमद्धे तुम्ही सुरगड हा किल्ला सुद्धा करू शकता. पण योग्य नियोजन केल तरच ते शक्य आहे. सकाळी लवकर सुरगड करून मग तळगड -कुडालेणी-घोसळगड करून दुसऱ्या दिवशी बिरवाडी आणि अवचिटगाड करता येतो. पण यासाठी तुम्हाला खाजगी वाहन आणि योग्य नियोजन कारव लागेल. तर आम्ही रात्रीच जेवण करून अवचितगडाच्या पायथ्याला असलेल्या मेढे या गावी आमचा मुक्काम केला. गडाच्या पायथ्याला विठ्ठल मंदिरात आपल्या झोपण्याची सोय होऊ शकते. तसेच गावात जेवणाची सोय सुद्धा होऊ शकते.

सकाळी लवकर उठून आम्ही गडावर जाण्यास सुरवात केली. गावातून गडाच्या दिशेने जाताना वाटेत एक लहं विहीर आणि एक मोठी विहीर लागते. या विहीरीच्या समोरच गडावर जाण्यासाठी वाट आहे. गड तसा परिचित आणि शहरापासून जवळ असल्याने गडावर येणाऱ्यांची संख्या येथे जास्त आहे. म्हणूनच गडावर जाणारी वाट ही मळलेली आहे. 

या वाटेवर एक युध्दशिल्प(वीरगळ) आहे .पूर्वाभिमुख प्रवेशव्दाराच्या जवळ एका दगडावर शरभाचे शिल्प कोरलेले आहे. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. तिथेच एक इ.स.१७९६ मध्ये कोरलेला शिलालेख आहे. गडावर व्दादशकोनी पाण्याने भरलेला तलाव आहे. या तलावाजवळ महादेवाचे मंदिर आहे. या तलावाच्या पश्चिमेला खालच्या बाजूस ७ टाक्याचा एक समूह आहे. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यांजवळच पिंगळाई देवीचे/ महिषासुरमर्दिनीचे छोटेसे मंदिर आणि एक दिपमाळ आहे. टाक्यांच्या भिंतीवर एक घुमटी व वीराचे दगडावर कोरलेले शिल्प आहे, ते बाजी पासलकरांचे शिल्प आहे असे मानले जाते. बालेकिल्ल्याच्या टोकाला टेहळ्णी बुरुज आहे.बुरुजावर चढण्यासाठी पायर्‍या आहेत. बुरुजावरुन नागोठणे खिंड, बिरवाडी किल्ला, कुंडलिका नदीचे खोरे इत्यादी परिसर न्याहाळता येतो. या पायऱ्या उतरून डाव्या बाजूला एक पायवाट जाते या वाटेने थोडदास पुढे उतरून गेल्यास एक लाकडी पूल आहे. हा पूल ओलांडून डोंगराच्या उजव्या बाजूने गेल्यास तिथे एक नैसर्गिक गुहा पाहायला मिळते. हे पाहून पुन्हा मागे यावे आणि गडाच्या उत्तर दिशेला जावे येथे  एक बुरुज आणि तोफ ठेवलेली आहे. याशिवाय गडावर तोफा, वाड्यांचे चौथरे, सदर इत्यादी गोष्टी पाहाता येतात.


|| हर हर महादेव ||
|| जय भवानी ||
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||
|| जय शंभूराजे ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा