बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

अचला, मोहनदरी, कण्हेरगड

अचला

नाशिक जिल्ह्यात अचला हा मध्यम श्रेणीचा गिरीदुर्ग प्रकारात येणारा हा किल्ला अजंठा सतमाळ रांगेत येतो. किल्ल्याची ऊंची ४०४० फुट इतकी आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी नाशिकमार्गे, मनमाडमार्गे आणि गुजरात वरून सापुतारामार्गे पोचता येते.
शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा मुघलाना चकवा देण्याकरिता खजिना दोन भागात विभागला गेला त्यागील एक भाग हा गोंदाजी नारायण या मराठा सरदाराने खजिना या किल्ल्यात लपविल्याची आख्यायिका आहे.
शुक्रवार दिनांक २५ नोव्हेंबर  २०२२ रोजी संध्याकाळी ८ वाजता आम्ही खाजगी वाहनाने मुंबई येथील बोरिवली वरून आमचा प्रवास सुरू केला. पहाटे ३.३० शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी आम्ही किल्याच्या पायथ्याला असलेल्या दगड पिंपरी गावात पोचलो. गावातील मारुती मंदिरात आम्ही आमच्याकडील तंबू ठोकून काही कल आराम केला आणि सकाळी ८ वाजता गडाकडे प्रस्थान करायला सुरवात केली. गावातील गावकऱ्यांकडून गड आणि आजूबाजूच्या परिसराची माहिती मिळाली. गडाच्या उजव्या बाजूच्या डोंगराला भैरोबाचा डोंगर असे ओळखले जाते. या इथे भैरोबाचे एक मंदिर आहे. आणि भैरोबाचा उत्सव देखील येथे करण्यात येतो. गडाच्या डाव्या बाजूला असलेल्या डोंगराला टवल्या या नावाने ओळखले जाते.
गडावर जाण्यासाठी गावातून पायवाटेने भैरोबाचा डोंगर आणि अचला किल्ल्याच्या घळीपर्यंत जाता येते किंवा गावातून थोडस बाहेर येऊन गावाकडे जाताना उजव्या बाजूने एक डांबरी रस्ता ह्याच घळीपर्यंत जातो. या इथून जाताना वाटेत एक घर लागते जर आपण खाजगी वाहन नेले असेल तर या इथे ते वाहन उभे करावे किंवा घळीकडे जाणार डांबरी रस्ता जेथे संपतो तिथे जंगलात वाहन उभे करून ह्याच कच्च्या वाटेने गडाच्या सोंडेच्या दिशेने वर चालत जावे. दुचाकी वाहनाने एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी गावकरी ह्या रस्त्याचा उपयोग करतात. ह्या खिंडीतून वर आल्यावर इथे एक मंदिर आहे. ह्या मंदिराला सतीचे देऊळ असे म्हटले जाते. पुढे अचला गडाच्या सोंडेवरुन वारच्या टप्प्यावर गेल्यास इथे एक पत्र्याचे छप्पर असलेले मारुती मंदिर आहे. ह्याच सोंडेवरून गडाच्या मागच्या बाजूने गडावर जाण्यास पायवाट आहे. ह्या वाटेवर काही ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. अर्ध्या पायऱ्या चढून वर गेल्यावर डाव्या बाजूला गडाच्या गर्भात एक ३ फुट x ३ फुट आणि जवळपास १० फुट लांब अशी एक गुहा आहे. ह्या गुहेत ४" पाणी आहे. ही गुहा एक सरळ अश्या कातळात असल्याने इथे पोचण्यासाठी सावकाश जावे. जर तुम्हाला गिर्यारोहणाचे ज्ञान असेल तर तुम्ही सहज इथे पोहचू शकता. पण नवख्या गिर्यारोहकांसाठी हा टप्पा तसा कठीण आहे जर योग्य मार्गदर्शन असेल तरच ही गुहा पाहता येईल. ही गुहा पाहून पुन्हा गडावर जाणाऱ्या पायवाटेवर येऊन गडावर जाण्यास सुरवात करावी. गडावर जाताना काही ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. गडमाथ्यावर पोचण्या आधी एक फुसटशी पायवाट उजव्या बाजूने थोडस खालच्या दिशेने आपल्याला घेऊन जाते. या इथे ८ टाक्यांचा अनोखा समूह आपल्याला पाहायला मिळतो. येथील सर्वात खालच्या बाजूच्या टाकी जवळ शंकराची पिंड आणि नंदी आहे. हे पाहून पहिल्या टाकी जवळ यावे इथून एक वाट थोडस वरच्या दिशेने गड माथ्यावर जाते या इथे आणखी २ पाण्याची टाक आहेत. इथून गड माथ्यावर प्रवेश केल्यावर एक टाक दिसत. त्या टाक्या भोवतीच्या झुडूपांवर कपडे पडलेले दिसतात. कुठल्याही मोठ्या आजारातून बरे झाल्यावर गावकरी या ठिकाणी येऊन स्नान करतात. त्यावेळी ते गावातून घालून आलेले कपडे या ठिकाणी सोडून, नविन कपडे घालून जातात. टाक्याच्या वरच्या बाजूला एका झाडाखाली काही मुर्ती ठेवलेल्या आहेत. पण त्या ओळखता येण्याच्या पलिकडे झिजलेल्या आहेत. त्यामागे घरांची जोती आहेत. हे पाहून परत किल्ल्यातील प्रवेश द्वारच्या विरुध्द दिशेला डाव्या बाजूला गेल्यावर एक मोठ पाण्याच कोरड टाक पाहायला मिळते. त्यात दगड पडून ते बर्‍याच प्रमाणात बुजलेल आहे. टाक पाहून परत प्रवेशव्दाराशी आल्यावर गडफ़ेरी पूर्ण होते. गडमाथा छोटा पण गडाची चाल तशी खूप आहे. गडावरुन अहिवंतगड, सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या, धोडप अश्या सतमाळ रांगेतील गडांच दर्शन होते. हे सगळ पाहून आम्ही गड उतरण्यास सुरवात केली आणि मोहनदार या किल्याकडे मार्गक्रमण केले. 
मोहनदर


हा किल्ला देखील नाशिक जिल्ह्यात अजंठा सतमाळ रांगेतील कठीण श्रेणीचा किल्ला आहे. किल्ल्याची ऊंची ३९०० फुट इतकी आहे. वणीच्या दिशेने गडाच्या पायथ्या जवळील मोहनदरी या गावाच्या दिशेने मुख्य रस्त्यावरून उजव्या बाजूने येताच डाव्या बाजूला ५ फुटयाच्या ८ विरगळी पाहायला मिळतात. ह्याच मार्गाने पुढे आल्यास डाव्या बाजूने एक डांबरी रास्ता मोहनदरी या गडाच्या पायथ्या जवळील गावात पोचतो. येथील आश्रम शाळेच्या इमारतीच्या बाजूला काही पाण्याच्या टाक्या आहेत. त्यातील गोल पाण्याच्या जवळून गडाकडे जण्यास सुरवात करावी.
मोहनदर उर्फ़ शिडका हा काहीसा अपरिचित किल्ला आहे. अहिवंतगडा पासुन ५ किमी आणि सप्तशृंगी गडापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला त्यावरील खिडकी सारख्या दिसणार्‍या नेढ्यामुळे आपले चटकन लक्ष वेधुन घेतो. या नेढ्य़ाबद्दल या भागात एक दंतकथा प्रचलीत आहे. महिषासुर या राक्षसाने आणि त्याच्या दोन भावांनी वणी परीसरात उच्छाद मांडलेला होता तेव्हा सप्तशृंगी देवीने महिषासुराच्या दोनही भावांचा वध केला. महिषासुर रेड्याच्या रुपात पळायला लागला. मोहनदरचा डोंगर ओलांडुन तो पलिकडे गेला. त्याच्या मागोमाग जाणार्‍या देवीने डोंगराला लाथ मारल्यामुळे नेढ तयार झाल. अजुन एका दंतकथेप्रमाणे देवीने मारलेल्या बाणामुळे नेढ तयार झाल. अशी आख्यायिका आहे.
परंतु विज्ञानाप्रमाणे लाव्हा रसापासून सह्याद्रीची निर्मिती होतांना काही ठिसुळ भागही निर्माण झाले. वार्‍या आणि पावसामुळे अशा भागांची झीज होऊन कातळकड्याला आरपार भोक पडत. त्याला नेढ अस म्हटल जात. दगडांच्या मधला ठिसुळ भाग ज्या प्रमाणात असेल तेवढा नेढ्याचा आकार असतो.
पाण्याच्या टाक्यांच्या पायवाटेने नेढयाच्या दिशेने चालत नेढयाजवळ यावे. ह्या इथे एक लोखंडी शिडी लावलेली आहे. हो शिडी चढून आपल्याला नेढयत जाता येते. ह्या नेढयाच्या विरुद्ध बाजूला उतरून उजव्या बाजूने एक वाट वर गड माथ्यावर जाते. गडाच्या पूर्व टोकावरून आपला गडावर प्रवेश होतो. तिथे उध्वस्त तटबंदींचे अवशेष पाहायला मिळतात. इथून पूर्व दिशेने चालत गेल्यावर २ सुकलेली पाण्याची टाकी दिसतात. पुढे गेल्यावर अजून ३ पाण्याची टाक आहेत. पूर्व टोकाकडे एक ध्वजस्तंभ आहे. इथून पश्चिम टोकाकडे चालत जातांना वाटेत पठारावर एक मोठ टाक पाहायला मिळत त्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे पश्चिम टोकाकडे चालत गेल्यावर तुटलेला कडा आहे. समोर खालच्या बाजूस नेढ आहे. त्यावर भगवा झेंडा लावलेला आहे. काही ठिकाणी घराची जोती दिसतात. हे पाहून गडाच्या प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते. गड व त्याच्या बाजूच्या डोंगरामधील घळीत एका बुरुजाच आणि तटबंदीच बांधकाम पाहायला मिळत.हे पाहून पुन्हा नेढा ओलांडून मोहनदरी गावाच्या दिशेने उतरण्यास सुरवात करावी.


कण्हेरगड 

आमचा पुढचा बेत हा कण्हेरगड हा नाशिक जिल्ह्यात अजंठा सतमाळ रांगेतील मध्यम श्रेणीचा किल्ला ३५८२ फुट उंचीवर आहे. अचला आणि मोहनदर हे किल्ले पाहून संध्याकाळ झाली होती म्हणून आम्ही कण्हेरगड च्या पायथ्या जवळील गाव सादड विहीर या गावात जाऊन मुक्काम करण्याचा निर्णय केला. गावातील मंदिराच्या शेजारी असलेल्या सभा मंडपात आम्ही आमचे तंबू ठोकले. ह्या वेळेस आम्ही जेवणाचा बेत आखला होता. संभामंडपाच्या बाजूला आम्ही चुलिवर जेवण केले. आणि गावकऱ्यानी सुद्धा आम्हाला लाकड आणि पाण्याची व्यवस्था करून दिली.
पहाटे तशी आम्ही थोडी उशीरच सुरवात केली. मंदिर समोरच पहाटे कण्हेर गड दिसत होता. आडवाटेवर असणारा हा किल्ला इतिहास प्रसिध्द आहे आणि बराच दुर्लक्षित सुद्धा आहे.
मंदिरासमोरून एक डांबरी रस्ता जातो हा रस्ता गडाच्या पायथ्यावळून जातो. जितून हा रस्ता उजव्या बाजूला वळतो तिथेच पुढे एक मळलेली वाट आपल्याला गडाच्या डाव्या बाजूकडील डोंगर आणि गड ह्यांच्या खिंडीत घेऊन जाते. ह्या खिंडीत पोचल्यावर सोंडेवरून गडाच्या दिशेने चालत जावे. वर जाण्याची पायवाट ही निसरडी आहे त्यामुळे सावकाश जावे. काही ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. वर गेल्यावर आपल्याला कातळात खोदलेला बुरूज दिसून येतो. बुरुजाच्या डाव्या बाजूने वर चढून गेल्यावर एक सुकलेल पाण्याच टाक दिसत. उजव्या बाजूने गेल्यास आपण बुरुजावर पोचतो. इथिण पुन्हा पाण्याच्या टाकीच्या दिशेने डाव्या बाजूने वर गेल्यास कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात ह्या चढून वर गेल्यावर आपण गडावरील नेढयात पोचतो. नेढया समोरील वाटेवरून वर चढून जाताना एके उद्ध्वस्त चौकटी प्रवेशद्वार पाहायला मिळते. गड माथ्यावर आल्यावर थोडस खालच्या दिशेने गेल्यास तिथे पिण्याच्या पाण्याच एक टाक आहे. हे पाहून पुढे सरळ चालत जावे इथे धोडप गडावर जशी दरी आहे तशी दरी पाहायला मिळते. हे पाहून गडाच्या मध्यभागी एक मंदिर, उद्ध्वस्त वास्तु आणि काही पाण्याची टाक आहेत. ह्याच टक्यांच्या उजव्या बाजूला खालच्या दिशेने खाली उतरल्यास २ गुहा आहेत. इथून धोडप गड दिसतो. हे पाहून गड उतार होण्यास सुरवात करावी.


|| हर हर महादेव ||
|| जय भवानी ||
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||
|| जय शंभूराजे ||


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा